II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

लोकसेवेची स्वयंप्रेरणा...


कुठल्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर आपल्या ध्येयाएवढेच सेल्फ मोटिव्हेशनही तेवढेच मजबूत असायला हवे. लातूर जिल्ह्यातील स्वयंप्रेरित हरेश्वर स्वामी यांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कुठल्याही शिकवण्या न लावता शिक्षक ते आयपीएसपर्यंतची यशस्वी वाटचाल केली. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारा हरेश्वर स्वामी यांचा यशस्वी प्रवास त्यांच्याच शब्दात..

यूपीएससी व एमपीएससीची तयारी करताना आपले ध्येय ठाम असायला हवे. शिवाय त्यासाठी प्रेरणा ही चांगल्या कारणातून यायला हवी. एखादा मित्र यूपीएससी परीक्षेची तयारी करतोय म्हणून आपणही करायची किंवा मोठा अधिकारी होऊन समाजात वावरायचे असा दृष्टिकोन आपला मुळीच नसावा. उलटपक्षी आपण अधिकारी होऊन सामान्य जनतेच्या उपयोगी पडू, मोठ्या पदावर जाऊन लोकांच्या अडचणी सोडवू अशी आपली स्वयंप्रेरणा असायला हवी. स्वयंप्रेरणा असली की तयारीमध्ये आपण कमी पडत नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहतो. यूपीएससी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण यातच यशाचे सूत्र दडलेले आहे. या परीक्षेची व्याप्ती खूप मोठी असल्याने नेमका आणि नियोजबध्द अभ्यास होणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम समजून घेतल्यास अभ्यासाची दिशा ठरवता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी बाजारात असलेली जाडजूड पुस्तके सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यातही वेळ घालवण्यात अर्थ नसतो. त्यातील नेमके कुठले विषय महत्त्वाचे आहे हे आपल्याला कळले पाहिजे. थोडक्यात काय वाचायचे नाही हे कळणेही खूप महत्त्वाचे असते. शिवाय या परीक्षेच्या तयारीदरम्यान निराशा, तणावाला दूर ठेवून नेहमी सकारात्मक राहून अभ्यास करायला हवा. शिवाय शिकवणी वर्ग लावलेच पाहिजे असेही नाही. न्युनगंड दूर ठेवत अभ्यासाची दिशा ठरवून सेल्फ स्टडी केली तर या परीक्षेत नक्कीच यश मिळते, हे स्वानुभवातून सांगतोय. 

ध्येयासक्ती
लातूर जिल्ह्यातील लोहारा (ता. उदगीर) हे माझे मूळ गाव. दहावीपर्यंतचे शिक्षण लोहार्यातच झाले. नंतर उदगीरला येऊन विज्ञान शाखेतून 11 वी - 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएससाठी प्रवेश मिळत होता पण प्रवेश शुल्क भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे डी. एड करून शिक्षक झालो. डी. एड. करत असतानाच पीएसआय परीक्षेची तयारी करणार्या मित्रांचा आमचा एक ग्रुप तयार झाला. येथूनच स्पर्धा परीक्षेच्या माझ्या तयारीला सुरुवात झाली. दरम्यान एलआयसीच्या परीक्षेत पहिले यश मिळाले. औरंगाबाद येथे एलआयसीच्या कार्यालयात विकास अधिकारी म्हणून रुजू झालो. मात्र यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याची खूणगाठ आधीच मनाशी बांधली होती. त्यामुळे अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. 2011 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात 32 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नांदेड येथे वित्त व लेखाधिकारी म्हणून रुजू झालो. कुठल्याही शिकवण्या न लावता यशाचा एक एक टप्पा पार करत 2013 मध्ये आयपीएस झालो. 

निर्धार 
यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आयपीएस सेवेसाठी निवड झाल्यानंतर 18 महिन्यांच्या प्रशिक्षणामध्ये पोलीस सेवेविषयीच्या जाणीवा आणखी घट्ट झाल्या किंबहुना आयएएसपेक्षा आपला पिंड पोलिसी सेवेचा असल्याची जाणीव झाली. या सेवेत लोकांना एकहाती न्याय मिळवून देण्यामुळे कामाचे समाधान अधिक मिळत असल्याची प्रचिती झाल्याने पोलीस सेवेतच राहण्याचा मी निर्णय घेतला.

पोलिसांची संवेदनशीलता 
पोलिसांना नेहमी संवेदनशील राहून आपले काम करावे लागते. एखाद्या गुन्ह्यामध्ये पीडिताचे पुनर्वसन आणि गुन्हेगाराला त्वरित गजाआड करण्याची प्राथमिकता पोलिसांसमोर असते. जनक्षोभ उसळल्यावर बळाचा वापर करण्यापेक्षा पोलीस समजावून सांगण्याच्या भूमिकेत असतो. शिवाय पोलीस विभागाने आधुनिकीकरण स्वीकारले असून समन्वय वाढल्याने गुन्ह्यांचे सिद्धीकरण वाढले आहे. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने केलेला मकोका (एमसीओसीए) कायदा दिल्ली पोलिसांनी जसाच्या तसा लागू केला आहे, हे एकरूपीकरणाचे उदाहरण सांगता येईल.

संधी 
यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आयपीएस होऊन सुरुवातीला एखाद्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक होणे एवढेच काही उमेदवारांच्या डोक्यात असते. परंतु या परीक्षेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी असते. सीबीआय, इंटेलिजन्स ब्युरो, रिसर्च ॲण्ड नलिसेस विंग (आरएडब्ल्यू), संयुक्त राष्ट्रसंघ पोलीस तसेच सीआरपीएफ, बीआयएसएफ सारख्या अर्ध सैन्यदलामध्ये काम करण्याची संधी या परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.

अभ्यास 
स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान अभ्यासाच्या पद्धती या व्यक्तिपरत्वे बदलतात. कुणाला चर्चात्मक अभ्यास आवडतो, कुणाला सेल्फ स्टडी तर कुणी शिकवणी वर्गावर भर देतो. मात्र तासनतास अभ्यास किंवा घोकंपट्टी करण्यापेक्षा, अभ्यासक्रमाप्रमाणे काठीण्य पातळीनुसार आपली आकलन क्षमता लक्षात घेऊन; गुणात्मक अभ्यास कसा करता येईल याचा विचार करावा.

मुलाखत 
मुलाखत ही आपल्या ज्ञानापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाची असते. पुण्यात काही मॉक इंटरव्ह्यू दिले. त्याच्या व्हिडीओ कॅसेट्सही आम्हाला मिळाल्या. त्यामुळे होणार्या चुका कळल्या. या चुका लक्षात घेऊन त्यावर काम केल्याने यशस्वी मुलाखत देता आली. मुलाखत घेणारे पॅनल आपण संबंधित पदासाठी असलेल्या निकषांस पात्र आहोत की, नाही याची पडताळणी करत असते. एखादा प्रसंग आपण कसा हाताळतो, आपण आपली बाजू किती ठामपणे मांडतो, प्रशासक होण्याच्या दृष्टीने आपण दबावाखाली येतो की, नाही आदी बाबी तपासल्या जातात. बोलण्याची भाषा ओघवती, विचारात स्पष्टता आणि उत्तरात प्रामाणिकता असेल तर मुलाखत यशस्वी झालीच समजा.

यशाचे श्रेय 
एखाद्या यशात प्रयत्न जरी आपले असले तरी त्यामागची प्रेरणा, सहाकार्य अधिक महत्त्वाचे असते. आई भगिरथी, वडील विश्वनाथ स्वामी, भारतीय राजस्व सेवेत दाखल झालेला व मोलाचे मार्गदर्शन करणारा माझा मोठा भाऊ शांतेश्वर स्वामी व दिलीप स्वामी, लहान भाऊ महेश स्वामी व कुटुंब माझी प्रेरणा बनून सदैव माझ्यासोबत होते. त्याचबरोबर माझ्यासोबत सुरुवातीपासून या परीक्षेची तयारी करणारा आयएएस मित्र नरसिंग पवार तसेच विनय पाटील यांच्या सहकार्यामुळे माझ्या करिअरला आकार आला. नरसिंग व मी सोबतच या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली व निवडही एकाच वर्षी झाली हे विशेष. त्यासोबतच उदगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे माझे मित्र, एलआयसीच्या औरंगाबाद कार्यालयामधील स्नेही तसेच माझ्या लोहारा गावामधील कुटुंब माझे सदैव प्रेरणास्थान राहिले.

यशाची सूत्रे

न्यूनगंड बाळगू नका
घोकंपट्टीपेक्षा गुणात्मक अभ्यासावर भर द्या.
सदैव स्वयंप्रेरित राहा.
उजळणी व आत्मचिंतन करा
शिकवणी वर्गाच्या मागे न लागता अभ्यासावर भर द्या
मुख्य परीक्षेसाठी कमी शब्दात आशय मांडण्याचा सराव करा
मुलाखतीत स्वत:शी प्रामाणिक राहा.

मराठी टक्का वाढवण्यासाठी...
यूपीएससीच्या परीक्षेत प्रादेशिक तीव्रता अधिक जाणवते. या परीक्षेत यशस्वी होण्याचा महाराष्ट्राचा टक्का तसा कमीच आहे. तो वाढवण्यासाठी दिल्ली येथे रुजू असलेले आम्ही सर्व महाराष्ट्रीयन अधिकारी महाराष्ट्र सदनमध्ये येणार्या उमेदवारांसाठी आवर्जून वेळ काढून मार्गदर्शन करतो. कुणी शिकवणी घेतो तर कुणी मॉक इंटरव्ह्यूसाठी वेळ काढतो. महाराष्ट्र सदनात दाखल होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या शंकाचे निरसन करण्यासाठी, सर्व अधिकारी तत्पर असतात. यासाठी राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (एसआयएसी) समन्वयक म्हणून काम पाहते.

शब्दांकन : राजाराम देवकर

स्त्रोत: महान्युज